दोन भागांमध्ये भेटणार मराठी साहित्यातील भाई अर्थात पु.ल

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मुंबई : मराठी चित्रपट आज खर्‍या अर्थाने कात टाकत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नुकताच मुंबई पुणे मुंबई 3 च्या रूपात मराठीत प्रथमच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शीत झाला आहे. त्यानंतर आता नवी वाट चोखाळत दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मराठी साहित्य विश्‍वात भाईगिरी करणार्‍या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेला भाई – व्यक्ती की वल्ली हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

वरळीतील ब्ल्यू सी हॅाटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सोहळ्याला वायकॉम 18 स्टुडीओजचे सीओओ अजित अंधारे, मराठी एंटरटेनमेंट वायकॉम 18 व्यवसाय प्रमुख निखिल सानेही या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मांजरेकरांनी हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगत उपस्थितांना आश्‍चर्याचा सुखद धक्काच दिला.

अगोदरच झाला होता निर्णय

पुलंचे व्यक्तिमत्व एका चित्रपटात सामावणारे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मांजरेकरांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि त्यांचे चिरंजीव गणेश मतकरी यांनी जेव्हा लेखन पातळीवर हा चित्रपट कागदावर उतरवला तेव्हाच खरे तर भाई दोन भागांमध्ये सादर करणंच योग्य ठरेल यावर निर्णय झाला होता, परंतु त्याची अधिकृत घोषणा ट्रेलर लाँचप्रसंगी करण्यात आली.

महिनाभरात दोन्ही चित्रपट

या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध 4 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग अर्थात उत्तरार्ध 8 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन भागांमध्ये जास्त अंतर न ठेवता महिन्याभराच्या फरकाने दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. सागर देशमुख आणि इरावती हर्षे यांनी या चित्रपटात पुलं आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

ऐतिहासिक व्यक्तिमत्वे

या दोघांखेरीज एकूण 70 कलाकारांची फौज या दोन चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांसारखी बरीच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वं प्रेक्षकांना भेटणार आहेत. वायकॉम 18 मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला अजित परबने संगीत दिले आहे.