पुणे । मारहाण, वाहनांची धडक, विहिरीत पडणे तसेच शिकारींमुळे दोन महिन्यांत देशभरातील 106 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. दिवसाला सरासरी एका बिबट्याचा मृत्यू होणे ही धोक्याची घंटा आहे, अशी भिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑफ इंडिया संस्थेने (डब्ल्यूपीएसआय) व्यक्त केली आहे. वन विभागाने बिबट्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही या संस्थेने म्हटले आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑफ इंडिया संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून बिबट्यांच्या मृत्यूची माहिती स्पष्ट झाली आहे.
महाराष्ट्रात 18 बिबट्यांचा मृत्यू
मागील दोन महिन्यांत झालेल्या मृत्यूंमध्ये शिकार, बिबट्यांवर झालेले हल्ले आणि अपघात ही प्रमुख कारणे असून, केवळ 12 बिबटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यातील सर्वाधिक घटना उत्तराखंडमध्ये झाल्या आहेत. तेथे 24, तर त्या पाठोपाठ महाराष्ट्रात 18 आणि राजस्थानध्ये 11 बिबटे मृत्यमुखी पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक बिबट्यांचा बळी मनुष्य-प्राणी संघर्षामुळे गेला आहे. गेल्या वर्षी (2017) देशात 431 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. यातील 159 बिबट्यांची शिकार झाली होती, तर सन 2016 मध्ये बिबट्यांच्या मृत्यूचा आकडा 431 होता. यातील 127 बिबट्यांची शिकार झाली होती. दर वर्षी शिकारीचा आकडा वाढत असल्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
सध्या सरकारचे लक्ष केवळ वाघांकडे
वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी बिबट्यांच्या झपाट्याने कमी होत असलेल्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यांनी म्हंटले आहे की, अभयारण्यामध्ये राहणारा बिबट्या आणि वर्षानुवर्षे मानवी वस्तीलगत राहत आलेला बिबट्या या दोन परिस्थिती आहेत. मनुष्य आणि बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सहभागातून सन 2015मध्ये राज्याचा बिबट्या संघर्ष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, यामध्ये अभ्यासपूर्ण पर्याय सुचविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची अंमलबजवणी झाल्यास या समस्येकडे पाहण्याचा गावकर्यांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. सध्या सरकारचे सगळे लक्ष केवळ वाघांकडे आहे. त्याच जोडीने इतर प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.
अनेक कारणांनी मृत्यू
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या बिबट्यांच्या मृत्यूंमध्ये 36 बिबट्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तर 23 घटनांमध्ये बिबट्यांचे कातडे आणि अवयव ताब्यात घेण्यात आले आहेत. अठरा घटनांमध्ये शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी गोळ्या घालून, तर काहींना विष देऊन मारण्यात आले आहे. रस्ता ओलांडताना आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, तर पाच घटनांमध्ये गावकर्यांनी बिबट्याला मारले आहे. सात बिबट्यांनी हद्दीच्या वादात दुसर्या बिबट्याशी भांडण करताना प्राण गमावला आहे; तसेच पाच बिबट्यांना वाघांनी मारले आहे. एवढेच नव्हे, तर गुजरात, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून तस्करी होत
असलेल्या चार जिवंत बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
शिकार करणे झाले सोपे
भोरमध्ये 13 फेब्रुवारीला वन क्षेत्रालगतच्या जागेत एक मादी आणि दोन बछडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या तिघांनाही विष देऊन मारल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकार्यांनी वर्तवला होता. या बिबट्यांना स्थानिक लोकांनी विष देऊन मारले असल्याचा आरोप वन्यप्राणीप्रेमींनी केला. मात्र, वनाधिकार्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून, तपासही थंडावला आहे. वाघाच्या शिकारीला पर्याय म्हणून अलीकडे शिकार्यांनी बिबट्याला लक्ष्य केले आहे. बिबट्याची कातडी आणि इतर अवयवांना काळ्या बाजारात चांगली मागणी असल्याने बिबट्यांची शिकार वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने महाराष्ट्रासह उत्तराखंड आणि इतर राज्यांतील बिबट्यांनी शेतामध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिकार्यांना शिकार करणे अधिक सोपे झाले आहे. भारतातील शिकार्यांना एका बिबट्याचे तीन ते चार लाख रुपये मिळतात. कातडी आणि इतर अवयव नेपाळमार्गे पुढे आठ ते दहा लाख रुपयांना विकले जातात. चीनमध्ये वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांची बेकायदा विक्री केली जाते.