वरणगाव । येथील बसस्थानक चौकात भंगाळे मेडीकलसमोर गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली आहे. याकडे मात्र पालिका पाणीपुरवठा सभापती बबलू माळी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे दररोज दिवसभरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांकडून पालिकेच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुषित पाण्याचा पुरवठा
या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पाईपमध्ये दुषीत पाणी शिरुन शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे. यातून नागरिकांना जलजन्य आजारांची लागण होऊ शकते. या ठिकाणी मोठा खड्डा करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप भंगाळे व नितीन कापूरे यांनी नगरपालीकेस कळविले असता या कामासाठी औरंगाबाद येथुन साहीत्य आणावे लागते असे सांगण्यात आले.
नागरिकांमध्ये तीव्र संताप
शुद्ध पाणी व सुंदर वरणगाव अशा घोषणा करणार्या पालिकेस पाईपलाईन दुरुस्तीस दोन महीने लागत असतील व नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर सुंदर शहर कसे होणार? पालिकेच्या या कारभारामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.