जळगाव । शहर पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने शनिवारी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यागेल्यानंतर त्यांनी तीन दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत. परंतू, त्यांच्याकडून आणखी काही मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी रिक्षाचालक असलेले रविंद्र मोतीलाल कुमावत (वय-23 रा. समतानगर) व रवी रामेश्वर इंगळे (वय-25 रा. शाहुनगर) हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. रिक्षाचालक असताना दोघांमध्ये मैत्री झाली होती.
इझी मनी मिळवण्याच्या नादात गोरखधंदा
काही महिन्यांपासून यातील रवी हा एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत होता. दोघांची मैत्री असल्यामुळे सोबत खाणे-पिणे देखील सुरू होते. अशात इझी मनी मिळवण्याच्या नांदात त्यांनी दुचाकी चोरीचा ‘गोरख धंदा’ सुरू केला होता. गर्दीच्या ठीकाणावरून मास्टर कीचा वापर करून दुचाकी चोरून ते निर्मनुष्य ठीकाणी उभी करून ठेवत असत. काही दिवसांनी ग्राहकाचा शोध घेऊन कमी-अधिक किमतीमध्ये दुचाकी विकून टाकत. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे पथक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांची माहिती काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या दोघांनी शनिवारी चोरीच्या तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनिल पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार, अमोल विसपुते, नवनीत चौधरी, दीपक सोनवणे आदींच्या पथकाने या चोरट्यांना शोध घेतला.
संशयितांवर होती नजर
दोघे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्यामुळे त्यांच्यावर संशय जाणे कठीण होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर दोन दिवसांपासून दोघांच्या हालाचली टीपल्या जात होत्या. या दोघांनी शुक्रवारी दुपारीच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातून एक दुचाकी लंपास केली. त्यावेळी देखील पोलिसांची त्यांच्यावर पाळत होती. अखेर पहाटे पाच वाजता दोन वेगवेगळे पथक तयार करून दोघांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर दुचाकींच्या संख्येसह संशयित देखील वाढणार आहेत, अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.