दोन वाहन चोरांना अटक

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने दोन वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई चाकण बाजारपेठेत करण्यात आली. आकाश राजाभाऊ शिंदे (वय 19, रा. चाकण), अक्षय अनिल लोमटे (वय 19, रा. चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली की, वाहन चोर आकाश शिंदे चाकणमधील बाजारपेठेत येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक दुचाकी मिळाली. त्याबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे समजले. यावरून त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र अक्षय याच्या मदतीने आणखी सात मोटारसायकल चोरल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार अक्षय याला देखील अटक करण्यात आली. दोघांकडून एक सुझुकी जिक्सर, एक पल्सर, पाच स्प्लेंडर, एक अ‍ॅक्टीव्हा अशा एकूण चार लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. यामुळे चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.