पोलिस उपअधीक्षकांच्या छाप्यात कारवाई ; आरोपीस अटक
भुसावळ- तालुक्यातील कन्हाळे बु.॥ येथे बेकायदा गावठी दारू बनवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह पथकाने छापा टाकून 78 हजार रुपये किंमतीची दोन हजार 800 लिटर गावठी दारू उद्ध्वस्त करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी पहाटे झालेल्या या कारवाईनंतर अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे
गोपनीय माहितीवरून कारवाई
कन्हाळे येथील आरोपी खलील हसन गवळी (31, कन्हाळा) हा घराखालील पत्री शेडखाली गावठी दारू बनवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. प्रसंगी 78 हजार रुपये किंमतीच्या 13 पत्री ड्रममधील गुळ, मोह, नवसागर मिश्रीत रसायन दोन हजार 600 लिटर गावठी दारूचे रसायन पथकाने नष्ट केले तसेच सहा हजार 500 रुपये किंमतीचा 200 लिटर मापाचा एक ड्रम, अॅल्युमिनिअम तगारी, चार हजार 900 रुपये किंमतीची 70 लिटर तयार दारू तसेच 936 रुपये किंमतीच्या 18 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तालुका पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल उमेश धोंडू बारी यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवाड, दिलीप पाटील, फुसे, प्रेम सपकाळे, राजेंद्र पवार, उमेश बारी, किरण सरदार, अजय शेख आदींचा सहभाग होता.