दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

शिरपूर । पंचायत समितीसमोर चाकडु ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारविरुध्द आमरण उपोषणला बसलेल्या उपोषणकर्त्यांना यश मिळाले असुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश करण्यात आल्याने 28 रोजी दुपारी 4 वाजता उपोषण मागे घेण्यात आले आहे. संबंधितांनी उपोषण मागे घेतले तरी मात्र दोषींवर कोणत्या स्वरुपाचा गुन्हा व केव्हा दाखल केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

उपोषण मागे
त्रिस्तरीय चौकशी समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अनुषंगाने चाकडु ग्रामपंचायत येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक व सध्या कार्यरत सरपंच व ग्रामसेवक हे दोषी दिसुन आल्याने त्यांच्या विरुद्ध चौकशी अहवालानुसार आर्थिक अपहाराची व अनियमिततेची रक्कम निश्‍चित करुन शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल विनाविलंब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सुवर्णा पवार यांना देण्यात आले तर पवार यांनी विस्तार अधिकारी आर.झेड. मोरे यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाची प्रत घेवुन सभापती रुलाबाई पावरा, उपसभापती संजय पाटील व पोलीस निरीक्षक संजय सानफ आदींसह कर्मचारी यांनी धुळे जिल्हा जागरण मंचचे अध्यक्ष डॉ. सरोज पाटील व चाकडु ग्रामस्थांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशाची प्रत सोपवून उपोषण मागे घेण्यास सांगितले.

24 पासून सुरु होते उपोषण
चाकडु ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार विरुध्द चाकडु ग्रामस्थांतर्फे 24 रोजीपासुन पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात आले. यात पंचायत समितीमार्फत चाकडु ग्रामपंचायतीची त्रिस्तरीय चौकशी नेमण्यात आली. त्यात त्रिस्तरीय चौकशी अहवाल धुळे सिईओंना पाठवण्यात आला. यात अहवालात नमुद केल्याप्रमाणे सन 2016-17 व 18 मधील रक्कम 67,61,994 एवढी रक्कमेचा आर्थिक अनियमितता व संशयीत अपहार झाल्याचे नमूद केले आहे. सन.2016-17 या वर्षातील 14 वा वित्त आयोगांतर्गत सौरदिवे खरेदीत 2,99,973 दरपत्रकाअभावी आक्षेपाधीन ठेवण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच 64,62,021 रुपये रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून 50 टक्के समप्रमाणात वसुल करण्याबाबत नमूद आहे.