दौंडमध्ये गोळीबारात तीन ठार!

0

दौंड : दौंडमधील नगरमोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बेछूट गोळीबार करून तिघांचा खून केला. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. संजय शिंदे असे या माथेफिरूचे नाव असून, त्याने सुरुवातीला नगर मोरी चौकात दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिसर्‍या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला.

तिघांचाही जागीच मृत्यू
गोपाल शिंदे (रा. वडार गल्ली, दौंड), प्रशांत पवार (रा. वडार गल्ली, दौंड) आणि अनिल विलास जाधव (रा. बोरावकेनगर, दौंड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मृत शिंदे, पवार आणि जाधव हे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने तिघांच्या दिशेने गोळीबार केला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

हत्यांमागील नेमके कारण अस्पष्ट
खून करून संजय शिंदे आपल्या घरी लपून बसला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याच्या घराला वेढा घातला. बराच वेळ आवाहन केल्यानंतर शेवटी तो घराबाहेर पडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्यांमागील नेमके कारण अद्याप पोलिसांना कळले नसून दौंड पोलिस अधिक तपास करत आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे खून झाले असावेत, असाही प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.