महसूल विभागाचे दुर्लक्ष : लाखोंचा महसूल बुडाला
यवत । दौंड तालुक्यातील वरवंड, कडेठाण, कुसेगाव पडवी येथे ओढा तसेच खाजगी जागेतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू आहे. गाव तलाठी आणि महसूल अधिकार्यांच्या आशिर्वादाने हा वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या वाळू चोरीमुळे लाखोंचा महसूल बुडवला जात आहे. दौंड तालुक्यातील डोंगराळ भागातून अनेक ओढे-नाल्यांचे पाणी भीमा नदीला जावून मिळते. यामुळे ओढे-नाल्यांच्या लगतच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात वाळू साठा उपलब्ध आहे. याचा फायदा स्थानिक वाळू माफिया घेत आहेत. खासगी जमिनींसह ओढा पात्रात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि यांत्रिक मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू उत्खनन अनेक ठिकाणे अडचणीच्या जागी असल्याने वाळू उपस्यांसंदर्भात महसूल अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्व प्रकरणामुळे वाड्या-वस्त्यांवर वाळू माफियांचे साम्राज्य निर्माण झाले आहेत.
कारवाईची मागणी
वरवंड-कडेठान रस्त्यालगत अवैध वाळू उपसा सुरू आहे. तसेच तलावालगत तीन ते चार ठिकाणी, महामार्गालगत असलेल्या इ. एस. दिवेकर महाविद्यालयाजवळ आणि गावठाणात ट्रकमधील चोरीची माती मिश्रित वाळू पाण्याच्या सहाय्याने धुतली जाते. खुलेआम होणार्या या वाळू उपशाकडे महसूल अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक अवैध वाळू उत्खनन ठिकाणी महसूल अधिकार्यांमार्फत पाहणी करून पंचनामा केला जातो. मात्र या ठिकाणांबाबत कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. या परिसरात सर्रासपणे सुरू असलेल्या वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.