मंचर । बदलत्या हवामानामुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली असतानाच आता द्राक्ष निर्यातीवर देखील संक्रांत आली आहे. सध्या द्राक्षांना हवा तसा भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच द्राक्ष निर्यातीसाठी गेल्या वर्षी किलोमागे 17 रूपये असणारी एक्साईज ड्युटी यावर्षी वाढून ती तब्बल 70 रूपये झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी देखील नाराज आहेत.
यासंदर्भात द्राक्ष बागायतदारांनी केंद्रिय कृषीमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी एक्साईज ड्युटीमध्ये सरकारने भरमसाठ वाढ केल्याने परदेशात द्राक्ष पाठवणे परवडत नसल्याचे मत द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी व्यक्त केले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्षाचे बाजारभाव घसरले असताना द्राक्ष उत्पादकांना सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये सवलत द्यावी. द्राक्ष पिकाला गेल्या वर्षी उच्चांकी बाजारभाव 130 ते 160 रूपये किलो मिळाला होता. यंदा बाजारभाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे किलोमागे वाढलेली भरमसाठ एक्साईज ड्युटी! यामुळे व्यापारी वर्ग यंदा द्राक्ष निर्यात फारसे करीत नाही.
थंडीमुळे उत्पादन खर्चात वाढ
जुन्नर-आंबेगावात द्राक्ष बागांचे शेकडो एकर क्षेत्र आहे. या परिसराची ओळख द्राक्षांचे माहेरघर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. सद्यस्थितीत द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष बागांमधील घडांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी एकरी अतिरिक्त 35 ते 40 हजार रुपये खर्च वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडाक्याची थंडी होती. त्यामुळे खर्चात वाढ झालेली असून द्राक्ष पिकाला समाधानकारक बाजारभाव मिळताना दिसत नाही.
योग्य हमीभाव मिळावा
सध्या चांगल्या प्रतीच्या मालाला 8 किलोच्या पेटीस 90 रूपये प्रतिकिलो असा एक्स्पोर्टसाठी बाजारभाव आहे. तसेच 10 किलो पेटीला कमी गुणवत्तेच्या द्राक्षाला 55 ते 65 रूपये किलो असा भाव असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष हे भांडवली पिक आहे. अनेकवेळा निसर्गाच्या संकटापुढे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेलेला आहे. या करिता द्राक्ष पिकाला योग्य हमीभाव मिळण्याकरिता शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी द्राक्ष बागायतदारांची मागणी आहे.
किलोमागे 53 रूपयांची वाढ
गेल्या वर्षी एक किलोला 17 रूपये एक्साईज ड्युटी लागत होती. यावर्षी ती वाढून तब्बल 70 रूपये इतकी एक्साईज ड्युटी लागत आहे; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोमागे 53 रुपये अशी भलीमोठी वाढ झालेली आहे. हा फरक शेतकरी आणि व्यापारी वर्गाला भरावा लागत आहे. त्यामुळे व्यापारी परदेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. परिणामी द्राक्षांची कमी दराने खरेदी होत आहे. परदेशात निर्यात फारशी होत नसल्याने देशांतर्गत द्राक्षाला फारसा उठाव नाही. साहजिकच बाजारभावही गडगडल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.