पुणे । गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये रविवारी तब्बल एक टन द्राक्षाची आवक झाली. द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात झाली असुन दरही चांगला मिळत आहे. सातारा, सांगाली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षाच्या उच्च दर्जाच्या प्रतिआठ किलोच्या बॉक्सला 600 ते 700 रुपयांचा भाव रविवारी मिळाला तर दुय्यम दर्जाच्या आठ किलो द्राक्षास 400 ते 500 रुपयांचा भाव मिळाल्याची माहिती द्राक्षाचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
पावसाळा लांबल्याने हंगाम उशीरा
यंदा पावसाळा लांबल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत द्राक्षाचा हंगाम उशीरा सुरू झाला आहे. मार्केटयार्डात आवक झालेल्या द्राक्षास स्थानिक फळविक्रेते तसेच लोणावळा, पनवेल आणि माणगाव परिसरातून सर्वाधिक मागणी आहे. सध्या मार्केटयार्डात अवघी एक टन द्राक्षाची आवक होत असून 15 ते 20 दिवसांनंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मोरे यांनी सांगितले. फलटण तालुक्यातील निरगुडी आणि बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सोनाका, तासगणेश आणि जम्बो द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.
पावसामुळे नुकसान
दरवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे काहीसे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षावर सध्या डावणी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे द्राक्षाचे नुकसान झाले आहे. तरीही दर्जा चांगला आहे. सध्या समाधानकारक बाजारभाव मिळत आहेत. आम्ही दोन एकरामध्ये द्राक्षाचे उत्पादन घेतले असून त्यातून 20 टनांचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सध्याचे बाजारभाव टिकून राहिल्यास चांगले उत्पन्न मिळेल.
– विठ्ठल सस्ते, शेतकरी