नंदुरबार। आज नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रांत मोबाईल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र नंदुरबार शहरात काही अतिउत्साही व हौशी मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास तसेच चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावरून मतदान यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाला नंदुरबारला केराची टोपली दाखविण्यात आली आहे, असेच यावरून दिसून येते.
या प्रकारामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. मतदान कोणाला करावे हे सर्वस्वी मतदारावर अवलंबून आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये व मतदाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बंद खोलीमध्ये बॉक्स करून त्याठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येतात. मात्र, मतदारांनीच या उद्देशाला हरताळ फासला आहे.
मतदान करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल आतमध्ये नेण्य़ास बंदी घातलेली असतानाही अनेक मतदारांनी व काही हौशी कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले आणि व्हायरल केले. त्यामुळे अशा घटनांवर निवडणूक आयोग आणि प्रशासन काय कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.