धक्कादायक: बोट उलटल्याने सांगलीत १४ जणांचा मृत्यू !

0

सांगली: गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीत सध्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान सांगलीमध्ये पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात ही घटना घडली आहे.

ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या ३० नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाली. बोट पलटी झाल्याने १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. इतर १६ जणांचा शोध सुरु आहे. हे बचावकार्य एनडीआऱएफकडून नाही तर स्थानिक तरुणांकडून सुरु होतं असंही कळत आहे. यावेळी लाइव्ह जॅकेट नसल्यानेच लोक आपला जीव वाचवू शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.मुख्यमंत्री सकाळी विशेष विमानाने कोल्हापूरला जाणार होते. मात्र दौऱ्यात बदल करण्यात आला असून प्रथम सांगलीकडे रवाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी सोबत महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत.