धक्कादायक विधान

0

अनेक सनदी अधिकारी सत्ताधार्‍यांना अनुकूल अशी भूमिका घेत असल्याचे आपण आधीदेखील अनुभवले आहे. तथापि, देशाच्या लष्कर प्रमुखपदी विराजमान असणार्‍या बिपीन रावत यांच्यासारख्या मान्यवराने आसाममधील घुसखोरीबाबत केलेले विधान हे अतिशय धक्कादायक आहे.अलीकडच्या कालखंडात भारतीय लष्करालाही भेदाची लाग होण्याचा धोका असल्याचे वारंवार अधोरेखित झालेले आहे. रावत यांच्या वादग्रस्त विधानामुळे यात सत्यांश असल्याचे आढळून आले आहे. यावर आता सोईस्कर पडदा टाकला जाणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी देशातील दुहीचे लष्करातही बीजारोपण झाले की काय? अशी भीती वाटू लागली आहे.

आसामच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये घुसखोरी हा अतिशय चिंतेचा विषय असल्याचे कुणी अमान्य करू शकणार नाही. आसाममधील घुसखोरी हा तसा आजकालचा विषय नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून शेजारच्या बांगलादेशातील लक्षावधी लोक आसाममध्ये सातत्याने घुसखोरी करून वास्तव्य करत असल्याचे सिद्ध झाले आहे. यातील बहुतांश लोकांनी तर येनकेनप्रकारे भारताचे नागरिकत्वही मिळवले आहे. या घुसखोरीला आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आटोकाट प्रयत्न करण्यात येत असले, तरी याला मर्यादा असल्याचेही दिसून आले आहे. विशेष करून भारत व बांगलादेशाच्या दरम्यानच्या सीमेवर अनेक दुर्गम भाग असल्यामुळे येथून जीव मुठीत घेत सीमेपारचे लोक भारतात येत असतात.

सीमेवरील लाचखोरीमुळेही याला खतपाणी मिळत असते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये रोहिंग्या समुदायामुळे घुसखोरीची भयावहता समोर आली आहे. म्यानमारमधील अत्याचारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तेथील लक्षावधी रोहिंग्या नागरिकांनी बांगलादेश गाठले. मात्र, तेथेही आश्रय न मिळाल्यामुळे रोहिंग्या नागरिक आसामसह अन्य मार्गांनी भारतात येत आहेत. यावरून आधीच मोठ्या प्रमाणात राजकीय रणकंदन झाले आहे. हा मुद्दा आता थंड झाला असतानाच लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा घुसखोरीतील धार्मिक आयाम वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

मुळातच घुसखोरीपासून सीमारेषांचे रक्षण करणे हे लष्कराच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे आणि भारताच्या विस्तृत सीमेचा विचार करता हे काम अत्यंत कठीण असले, तरी आपले जवान अष्टौप्रहर सीमेचे रक्षण करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी घुसखोरीबाबत भाष्य करणे गैर नाही. तथापि, याला राजकीय आणि विशेष करून धार्मिक आयामातून सादर करण्याचा प्रकार हा अतिशय धक्कादायक असाच आहे. यात त्यांनी घुसखोरीला पाक आणि चीनची फूस असल्याचा दावा केला. यासोबत त्यांनी घुसखोरीमुळे आसाममधील काही जिल्हे अल्पसंख्याकबहुल बनत असल्याची माहिती दिली आणि याचाच परिपाक म्हणून भाजपपेक्षा एआययूडीएफ या पक्षाची वेगाने वाढत होत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. वास्तविक पाहता ही तुलनाच अप्रस्तुत आहे. प्रत्येक पक्षाचा स्वत:चा एक राजकीय अजेंडा असतो. देशात अनेक राजकीय पक्ष हे हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारे आहेत. केंद्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी मानणार्‍या भारतीय जनता पक्षाची सरकारे आहेत. ही सर्व सरकारे लोकशाही मार्गाने निवडून येऊन सत्तारूढ झाली आहेत. याच प्रकारे आसाममधील खासदार बदरूद्दीन अजमल यांनी स्थापन केलेल्या एआययूडीएफ या पक्षाला लोकशाही मार्गानेच यश मिळाले आहे. यामुळे कुणी भाजपच्या यशावर बोट ठेवू शकत नाही. याच पद्धतीने एआययूडीएफच्या यशाबाबतही कुणाला आकस असण्याची आवश्यकता नाही. मात्र, थेट आपल्या लष्कराचे प्रमुखच जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. अर्थात भारतीय समाजातील दुहीचे बीजारोपण लष्करालाही झाल्याचे बाब यातून अधोरेखित झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मिरात शहीद झालेल्या पोलिसांच्या धर्मावरून केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यांनी शहिदांमध्येही हिंदू-मुस्लीम भेद केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झडल्या होत्या. आता हेच ओवेसी लष्करप्रमुखांच्या भूमिकेवर कडाडून टीका करत असल्याची बाब ही त्यांच्या दुटप्पीपणालाच दर्शवणारी आहे. विशेष बाब म्हणजे याच ओवेसी महोदयांनी रोहिंग्या शरणार्थींबाबत केंद्र सरकार आकसाची भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. ते मुस्लीम धर्मीय असल्यामुळे केंद्र सरकार आकसाने वागत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. आता लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने त्यांना नवीन मुद्दा मिळाला आहे. भारतीय समाजातील दुभंगलेपण हे नवीन नाही. आपण कोणत्याही भारतीय नागरिकाला नेहमी त्याचा धर्म, जाती, भाषा, प्रांत, संस्कृती आदींच्या माध्यमातूनच पाहत असतो. यावरून आजवर अनेकदा रक्तरंजित संघर्ष झालेला आहे. अद्यापही हा भेद मिटलेला नाही. या भेदाचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रतितिबिंब उमटले आहे. मात्र, देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे अशा लष्कराचे प्रमुखच जर याच पद्धतीचे वर्तन करत असतील तर याला काय म्हणणार? भारतीय लष्करात आधीपासून जातीवर आधारित काही बटालियन्स आहेत. ब्रिटिश कालखंडापासून यांची स्थापना करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात या विविध बटालियन्सनी शौर्याच्या अनेक अध्यायांची निर्मिती केली आहे. मात्र, जातीवर आधारित बटालियन्स असल्या तरी लष्करात जातीवाद नसल्याचे आपण अभिमानपूर्वक सांगत असतो. तथापि, बिपीन रावत यांच्या वक्तव्यामुळे लष्करात धर्मावर आधारित भेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे राजकीय क्षेत्रात शहिदांचा धर्म तपासून पाहिला जात असतांना लष्करातही जर यावरूनच भेद होत असेल, तर ही बाब देशाच्या हितासाठी अत्यंत अपायकारक अशीच आहे. रावत यांच्या वक्तव्याबाबत लष्कराच्या प्रवक्त्याने खुलासा केला आहे. मात्र, याचे गांभीर्य पाहता खुद्द लष्कर प्रमुखांनीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे तसेच भविष्यात या प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत याची काळजीदेखील घेण्याची गरज आहे.