धडकेनंतर कारला 20 फुटानंतर नेले फरफटत

0

जळगाव । ईच्छादेवी चौफुलीकडून शिवकॉलनीकडे जाणार्‍या ट्रकने सिग्नल जवळ असलेला खड्डा वाचवताना बाजुला चालणार्‍या कारला धडक देऊन 20 फूटांपर्यंत फरफटत नेले. सुदैवाने या अपघाता कोणाही जखमी झाले नाही. मुळचे जामनेर येथील आणि मुलूंड (मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता असलेले रवींद्र पांडुरंग पाटील (वय 45) हे त्यांच्या पत्नी सरोज रवींद्र पाटील (वय 40) यांच्यासह रावेर तालुक्यातील सावदा येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. मंगळवारी दुपारी लग्न सोहळा आटोपून ते त्यांच्या कारने (क्र. एमएच-03-सीके-0522) मुंबईकडे जात होते.

मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातील सिग्नल पार करून जात असताना मजूर फेडरेशन समोर असलेल्या गतिरोधकाजवळ असलेला खड्डा वाचवताना ट्रकने (क्र. ओडी-15-इ-6168) पाटील यांच्या कारला धडक दिली. ट्रकने कारला धडक दिल्यानंतर कारला 20 फुटांपर्यंत फरफटत नेेले. त्यावेळी आकाशवाणी चौकात ड्युटीवर असलेले शहर वाहतूक शाखेचे नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, शैलेंद्र बाविस्कर, गजानन महाजन यांनी धावत जात ट्रक ला आडवले. त्यानंतर ट्रक चालकाला ताब्यात घेऊन जिल्हा पेठ पोलिसांना स्वाधीन केले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.