धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे – सुभाष देसाई

0

मुंबई । विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले गैरव्यवहाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. बेफाम आरोप करण्यापूर्वी नीट माहिती घेतली असती तर मुंडेंना; तोंडावर आपटावे लागले नसते, असा टोलाही देसाईंनी लगावला.

उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीची जमीन विनाअधिसूचित केल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर, सुभाष देसाई यांनी हा खुलासा केला आहे. एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जोरजबरदस्तीने ताब्यात घ्याव्यात, असे धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे काय, असा सवालही देसाई यांनी केला.

इगतपुरी तालुक्यात २००७ मध्ये एमआयडीसीने २५७ हेक्टर जमीन अधिसूचित केली होती. त्यापैकी १५१ हेक्टर क्षेत्र २०१४ पूर्वीच आघाडी सरकारने वगळले आहे तर उर्वरित क्षेत्राच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत मोजणीही करू दिली नव्हती. त्यामुळे विखुरलेल्या क्षेत्रावर उद्योग येणे कठीण असल्यानेच सदर क्षेत्र वगळण्याची शिफारस एमआयडीसी व उद्योग सचिवांनी केली होती. त्यानुसार जमीन वगळण्यास मान्यता दिली आहे, असे देसाई यांच्या खुलाशात म्हटले आहे.