नागपूर-राज्यात आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये धनगर समाज रस्त्यावर उतरला असून गुमगाव – वर्धा रोडवर आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आज सकाळपासून राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन सुरु आहे. नागपूरमधील गुमगाव – वर्धा रोडवर खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी रस्त्यावर आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली. पोलिसांनी खासदार महात्मे व काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, धनगर समाजाचे आंदोलन अधिक उग्र होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू असून शुक्रवारी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप खासदार डॉ.विकास महात्मे आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्य़ाद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. वेळी धनगर समाजास आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यापार्श्वभूमीवर राज्यात आंदोलन सुरु आहे.