धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन

0

येत्या 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर रथ यात्रा

बारामती : महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी व या प्रश्‍नाची सोडवणूक करावी म्हणून येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती धनगर आरक्षण समन्वय समितीचे मुख्य संयोजक पांडुरंग मेरगळ व अविनाश देवकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे धनगर समाजाच्या आंदोलनावेळी आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्‍वासन दिले होते. मात्र भाजपने धनगर समाजाला फसविले आहे. याचा निषेध म्हणून येत्या 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर अशी राज्यव्यापी धनगर जागरण रथ यात्रा काढली जाणार आहे. ही रथयात्रा विदर्भ, मराठवाडा, उत्त्र महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र पूर्ण करून जेजुरीमध्ये मल्हारी मार्तंडाचा जागरण घालून साकडे घातले जाणार आहे. तेथून पुन्हा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. या टप्प्यात अहिल्यादेवींचा दिमाखदार पालखी सोहळा जेजुरी ते पंढरपूर असा आयोजित केला जाणार आहे.

राज्यातील दीड कोटी धनगर बांधवांना काँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप-शिवसेनेही फसविले आहे. त्यामुळे यळकोटाच्या जयघोषात ढोल, कैताळाचा नाद करीत पंढरपूरला उपोषणाच्या म्हणजेच आत्मक्लेशाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी सुंबरान मांडणार आहोत, असेही देवकाते यांनी सांगितले.