धनगर समाज घरावर लावणार काळे झेंडे

0

गोपीचंद पडळकर यांची माहिती : ‘मेगाभरती’ रद्द करण्याची मागणी

पुणे : जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने ‘मेगाभरती’ रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला परिपत्रक काढत आरक्षण दिले. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.

आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने आणि मेळावे सुरू आहेत. ‘धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा’ यात पडळकर व उत्तमराव जाणकर यांनी राज्यभरात ‘एल्गार मेळावे’ घेत लढा उभारला. आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खांदेशमध्ये मेळावे घेत पडळकर यांनी आरक्षणाची मागणी केली आहे.

सरकार याप्रश्‍नी चालढकल करत असल्याने आंदोलनाचा पुढील टप्प्यावर राज्यभरातील समाज बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील धनगर समाजाने 12 ते 19 डिसेंबरपर्यंत घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन पडळकर यांनी यावेळी केले.

पडळकर म्हणाले, धनगरसमाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी. जर सरकारने धनगर आरक्षण न देता मेगा भरती राबविल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.