फैजपूर। येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाची उमवि स्तरीय शैक्षणिक गुणवत्ता यादीतील कामगिरी विशेष उल्लेखनीय असून शैक्षणिक वर्ष 2015-16 मधील दोन विषयात सुवर्णपदके आणि दोन विषयांत विशेष नैपुण्य मिळविले. शैक्षणिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण आठ विद्यार्थीनींनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. त्यापैकी दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. याही वर्षी मुलीनी शैक्षणिक क्षेत्रातील घोडदौड कायम राखत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या त्यापैकी प्रियंका जगन्नाथ पाटील त्यांनी एम.ए. इंग्रजी विषयात 1हजार 600 पैकी 1 हजार 327 गुण प्राप्त करुन 82.94 टक्केवारीने विद्यापीठातून सर्वप्रथम येवून महाविद्यालयाला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. हे महाविद्यालयाचे एम.ए. इंग्रजी विषयांचे दुसरे सवर्णपदक असून शैक्षणिक वर्ष 2011-12 मध्ये जितेंद्र प्रकाश सोनार या विद्यार्थ्यांना पहिल्या सुवर्णपदकाचा सन्मान मिळाला होता. योगिता संजय महाजन या विद्यार्थीनीने एम.एस्सी (प्राणीशास्त्र) विषयात 2 हजार पैकी 1 हजार 505 गुण मिळवून पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. एम.एस्सी (प्राणीशास्त्र) या विषयातील विद्यार्थ्यांनी सलग मागील तीनही वर्षात विद्यापीठस्तरीय तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.
गुणवंतांचा केला सत्कार
रेणुका देव या विद्यार्थीनीने बी.एस्सी (जैवतंत्रज्ञान) विषयात 1 हजार 900 गुणांपैकी 1 हजार 575 गुण मिळवून तृृृतीय क्रमांक मिळविला. यशश्री राणे हिने बी.एस्सी (रसायनशास्त्र) विषयात 1 हजार 900 पैकी 1 हजार 705 मिळवून विद्यापीठात चतुर्थ क्रमांक मिळविला. या चारही विद्यार्थीनींचे तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ. एस.के. चौधरी, उपाध्यक्ष दामोदर पाटील, चेअरमन लिलाधर चौधरी, व्हा.चेअरमन प्रा. के.आर.चौधरी यांनी अभिनंदन केले.