जळगाव : श्री सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी पतसंस्थेकडून 2005 मध्ये चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील व्यक्तीने 25 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र त्या बदल्यात त्याने पतसंस्थेला धनादेश दिला होता. तो न वटल्याने त्याच्यावर धनादेश अनादर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात गुरूवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांनी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील किशोर यशवंत दुसाने याने 28 मार्च 2005 रोजी सरदार पटेल पतसंस्थेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज घेते होते. त्याने कर्जाची नियमित परतफेड केली नव्हती. कर्जाच्या उर्वरीत रकमेच्या बदल्यात त्याने जिल्हा बँकेचा 10 हजार रुपयाचा धनादेश दिला होता. मात्र तो धनादेश न वटल्याने या प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. त्यात फिर्यादीपक्षातर्फे अॅड. आर. आर. गिरणारे यांनी 1 साक्षीदार तपासला. या प्रकरणी गुरूवारी न्यायाधीश गोरे यांनी आरोपी किशोर दुसाने याला 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 2 महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.