धमक्या देतो म्हणून भडकलेल्या धाबामालकाने केला होता गोळीबार

0

भिवंडी । भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत दीपक विजय भोईर या युवकावर गोळीबार झाला होता. आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात इतर संशयित आरोपीच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दीपक भोईर याने धाब्यावर दादागिरी केल्यानंतर तेथील धाबामालकाने त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आरोपींच्या ताब्यातून 2 पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. भिवंडी तालुक्यातील बायपास रस्त्यालगतच्या वडपे गावात 26 मे च्या रात्री 12 वाजताच्या सुमारास दीपक भोईरवर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर जखमी दीपक भोईर याने आपल्या जुन्या वादातून खांडपे येथील युवक सागर रंगनाथ पाटील याने गोळीबार केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सागर पाटील यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

या गोळीबाराचा तपास भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यावेळी चौघुले यांना या गोळीबारात दुसर्‍याच आरोपींचा हात असल्याचा संशय आला. त्या संशयाच्या आधारावर त्यांनी तपासचक्रे फिरवली आणि वडपे बायपास नाका येथील मेजबान धाब्याचा मालक हा गोळीबाराच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी धाबा मालक फैजान अहमद फक्रुद्दीन शेख याचे मोबाइल सिडीआर तपासले असता, हा गोळीबाराचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी धाबामालक शेखचा माग काढीत त्यास ताब्यात घेतले असता, फैजान शेख याने जखमी दीपक भोईर हा धाब्यावर येऊन धमकी देऊन फुकटात जेवण व पार्सल घेऊन जात होता. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आपले मुंबई येथील मित्र अरमान मोहम्मद रबीज खान (रा. सांताक्रुझ ) धिरेंद्रकुमार रामदेव सिंग (रा. गोरेगाव ) यांच्या मदतीने दीपक भोईर यावर गोळीबार केल्याचे कबूल केले.

सागर पाटीलला दोषमुक्त करणार
या प्रकरणात पोलीस पथकाने गुन्ह्यातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून हल्ला करण्यासाठी सुल्तानपूर येथून आणलेले 2 पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यापैकी अरमान मोहम्मद रबीज याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्यावर सुल्तानपूर येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले यांनी दिली. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर पाटील यास दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याचे चौगुले यांनी सांगितले.