जळगाव : लाच मागणी प्रकरणात आपल्यावर ट्रॅप (सापळा) आल्याची कुणकुण लागताच धरणगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेला मात्र अमळनेरातील रहिवासी असलेला पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे याने तक्रारदाराच्या खिशातील डिजिटल व्हाईस डिव्हाईडर घेवून धूम ठोकली होती. आरोपी जळगावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास 27 रोजी अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यास अमळनेर न्यायालयात हजर केले असता 31 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विलास बुधा सोनवणे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
व्हाईस डिव्हाडरसह पळाला होता आरोपी
धरणगाव पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात न्यायालयात चार्जशीट (दोषारोपपत्र) पाठवल्यानंतरही शिक्षा होणार नाही म्हणून 19 हजारांची लाच पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे याने मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार व आरोपी बोलत असताना आरोपीला आपल्यावर आलेल्या ट्रॅपचा अंदाज आला व त्याने तक्रारदाराच्या खिशातील डिजिटल व्हाईस डिवाईडर घेवून धूम ठोकली होती. या प्रकरणी आरोपीविरोधात 8 मार्च 2021 रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एसीबी आरोपीचा शोध घेत असलेतरी तो पथकाला गुंगारा देत होता मात्र आरोपी गुरुवार, 247 रोजी जळगावात आल्याची माहिती एसीबी जळगाव युनीटमधील हवालदार दिनेशसिंग पाटील यांना मिळताच त्यांनी जळगावच्या बहिणाबाई उद्यान परीसरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला शुक्रवारी अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यास 31 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.