धरणगाव : येथील साहित्य कलामंच यांच्यावतीने दिले जाणारे बालकवी काव्यपुरस्कारांचे वितरण दिनांक 13 आॅगष्ट रविवार रोजी सकाळी. 10वा. विक्रम ग्रंथालय व वाचनालयात आयोजित करण्यात आले आहे. लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव व सुप्रसिध्द कवी शशिकांत हिंगोणेकर व नाशिक येथिल कवी दिलीप पाटील हे पुरस्काराचे मानकरी आहेत. सुप्रसिध्द कवी प्रकाश किनगावकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून जेष्ठ कवयित्री सौ. मायाताई धुप्पड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डी. जी. पाटील व प्रा. आर. एन. महाजन उपस्थित राहतील.
रौप्य महोत्सवी वर्ष
बालकवी काव्य पुरस्कारांचे हे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष असून शशिकांत हिंगोणेकर यांच्या “नवे स्वगत” या काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार तर दिलिपराव पाटील यांच्या “दुरून कुठून तरी” या काव्य संग्रहाला खान्देशस्तरीय पुरस्कार जाहिर झाले आहेत. पुरस्कारासाठी आलेल्या 31 प्रवेशिकांमधून पुरस्कारांची निवड प्रसिध्द साहित्यिक सदानंद देशमुख, प्रा. मनोहर जाधव, डाॅ. संजीवकुमार सोनवणे, प्रा. बी. एन. चौधरी यांच्या निवड समितीने केली आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
बालकवी जयंती
13 आॅगष्ट रोजी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांची 127 जयंती आहे. या निमित्ताने त्यांची प्रतिमा पुजन व स्मृतीला उजाळा असा कार्यक्रम नियोजित आहे. हे वर्ष त्यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने साहित्य कलामंच मंच वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविणार असल्याचे मंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांनी सांगितले.
कवी आपल्या भेटीला
इ. 10वी ला मराठी विषयात कवी प्रकाश किनगावकर यांची “वारस” ही कविता अभ्यासक्रमात आहे. या कार्यक्रमात 10वीचे विद्यार्थी प्रत्यक्ष कवीशी त्याच्या काव्य निर्मितीबद्दल संवाद साधतील असे मंचचे सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंचचे पदाधिकारी प्रभाकर नेरपगार , वं. दे. लोहार, एस. पी. कुलकर्णी, शरदकुमार बन्सी, डॉ. एस. पाटील, बी. डी. शिरसाठ, कैलास पवार, वासुदेव पाठक, बाळ भावे परीश्रम घेत असून नागरिक, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.