मुंबई : धार्मिक आधारावर सेलिब्रेटी खेळाडूंना टीकेचे लक्ष्य करण्याचा सोशल मिडीयावर सध्या ट्रेंड आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या पत्नीचा ड्रेस असाच टीकेचा धनी बनला होता, त्यापाठोपाठ मोहम्मद कैफलाही लक्ष्य करण्यात आले होते. आता त्यात टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा हिच्या नावाची भर पडली आहे. लहानपणापासूनच सानियाला हा खेळ खेळताना घालाव्या लागत असलेल्या आखूड ड्रेसमुळे लक्ष्य बनविले गेले होते. मात्र यावेळी तिने लहंगा, चुनरी असा पारंपारिक भारतीय पोशाख करून त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्यामुळे तिला टिकेचे लक्ष्य केले गेले आहे.
सोशल मिडीयावर चर्चा
सानियाने पारंपारिक लाल लेहंगा, चुनरी व पारंपारिक भारतीय दागिने घालून काढलेले फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. त्याला सुमारे २ लाख युजर्सनी कमेंट दिली आहे. काही जणांनी तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तिच्या सुंदरतेचे अनेकांनी कौतुक केले आहे मात्र काही धर्मांध प्रवृत्तींनी तिच्यावर देखील टीका करत तिला बुरखा घालण्याचा सल्ला दिला आहे. काही जणांनी शैतान की अम्मा असेही मत दिले आहे तर काही जणांनी या ड्रेसमधून तिच्या शरीराचा काही भाग दिसतो आहे म्हणून टीका केली आहे. अर्थात सानियाने कोणत्याच टीकेला प्रत्युत्तर केलेले नाही.
शमी, कैफ देखील लक्ष्य
यापूर्वी क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीच्या एका ड्रेसवरून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. एका पार्टी दरम्यान स्लीवलेस ड्रेसमध्ये दिसत असलेली शमीची पत्नीला सोशल मिडियात सल्ले दिले दिले गेले होते. एक मुस्लिम महिलेने संपूर्ण कपडे घालणेच योग्य असा सूर लावला होता. पत्नीसोबत शेअर केलेल्या फोटोवरून क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर काही कट्टरपंथीयांनी जोरादर टीका केली होती. या टीकेला शमीने देखील चोख प्रत्युत्तर दिले होते. ती माझी पत्नी आहे. काय करायचे आणि काय करायचे नाही हे मला चांगले माहिती आहे. प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारावे आपण किती चांगले आहोत, असे ट्विट शमीने केले होते. तसेच मोहम्मद कैफच्या प्राणायाम करण्यावर देखील कट्टर धर्मांधांनी सोशल मिडीयावर तोंडसुख घेतले होते.
सानियावर आधीही झाली होती टीका
भारतात जेव्हा महिला खेळाडूंसंदर्भात चर्चा केली जाते, तेव्हा आपल्या जिभेवर एकच नाव येते सानिया मिर्झा. टेनिस जगात प्रवेश केल्यानंतर अफवा आणि टोमण्यांवर मात करीत हैदराबादच्या या टेनिसपरीने भारतीय ध्वजाची शान वाढविली आहे. ज्या काळात भारतात महिला टेनिसने आजीबात आस्तित्व नव्हते त्या काळात सानियाने भारताचे नाव रोशन केले. महेश भूपती आणि लियांडर पेस यांसारख्या मात्तबर खेळाडूंचा दबदबा पार करून सानियाने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. 2003 मध्ये डेब्यू करणारी सानिया गेल्या 13 वर्षांपासून महिला टेनिसमध्ये अखंडपणे भारताला मान मिळवून देत आहे. मात्र याच सोनियावर काही कट्टर धर्मांधांनी आधीही छोट्या कपड्यांवरून टीका केली आहे. मात्र यांकडे दुर्लक्ष करत तिने चांगल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.