धर्मांप्रती आदराचा वसा घेऊन भारताला महान बनवूया : मुख्यमंत्री

0

मुंबई :- भारतीय संस्कृतीमध्येच विविध धर्मांप्रती आदर-सन्मान अंतर्भूत आहे. हा वारसा घेऊन आपण गरीब,दुर्बलांना मदत करण्याचा वसा घेऊ आणि भारताला महान बनवूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इंडो अरब सोसायटीच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस शुभेच्छापर संदेशात बोलत होते.मरिन ड्राईव्ह इस्लामी जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमास आमदार अमीन पटेल, नगरसेवक अतुल शहा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ईद मानवतेचा उत्सव आहे. सर्वांसोबत आनंद द्विगुणित करण्याचा सण आहे. आनंद, सुख वाटले की ते आणखी वाढते, असे आपण मानतो. त्यामुळे या आनंदात गरीब, वंचितांना सहभागी करून घेतले जाते. भारतीय संस्कृतीत सर्व धर्मांना आदराचे स्थान आहे. धर्माचरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यामध्ये, त्या सर्व शक्तीमान नियंत्यापुढे आपण नतमस्तक होतो. त्याठिकाणी कुठल्याही भेदभाव नाही, मग आपणही तसा भेद करू नये. गरजू, गरीब आणि दुर्बलांना मदत करण्याची भावना वाढवू आणि भारताला महान बनवूया.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अरब राष्ट्रांशी दृढ संबंध प्रस्थापित झाल्याचे आणि नुकताच झालेल्या विदेश दौऱ्यात दुबईत मुंबईतील धारावी झोपडपट्टी विकासासाठी महत्त्वपूर्ण करार केल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केला. कार्यक्रमात सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना सोसायटीचे मानद सदस्यत्वही प्रदान करण्यात आले.सोसायटीचे अध्यक्ष सोहेल लोखंडवाला यांनी प्रास्ताविक केले. आमदार पटेल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष सोहेल लोखंडवाला, उपाध्यक्ष शब्बीर रंगवाला, मोहिद नासिर, सोहेल खंडवानी, डॉ.मोहमद पाटणकर, हमिदा भिवंडीवाला, इक्बाल मेमन, मोहम्मद लोखंडवाला,नबी अख्तर, सोसायटीचे सचिव अब्दुल साजिद शेख, अमीन पारेख, सोहेल बुटावाला, अॅड. काझी मेहताब आदींची उपस्थिती होती.