धर्माचरण आणि पाखंड खंडन हीच खरी गणेशपूजा!

0

उत्सवामध्ये उन्माद नको!
गणेशोत्सव काळात सक्तीने वर्गणी गोळा करणे, अवाढव्य मूर्ती बसवणे, चढ्या स्वरांत आरती म्हणणे, ध्वनीक्षेपकावर मोठ्या आवाजात चित्रपटांतील गाणी लावणे, विसर्जन मिरवणुकीत थिल्लरपणे नाचणे, चुकीचा संदेश देणारे देखावे उभारणे, विद्युत रोषणाईवर अनाठायी व्यय करणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी आढळून येतात. राजकीय भवितव्य म्हणूनही या उत्सवाकडे पाहिले जाते. खरे तर उत्सव साजरा करताना त्यात उन्माद नाही, तर उत्साह असावा. आजच्या तरुण पिढीकडे कल्पकता आहे. मात्र, त्याला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे.

समाजहिताचे आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हावेत!
सध्या उत्सवाचा प्रबोधनापेक्षाही मनोरंजनाकडे कल दिसून येतो. व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, पोवाडे, मेळावे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन अपवादात्मक स्थितीत होताना दिसते. त्याऐवजी चित्रपटातील गाणी, चित्रपट कलाकार, राजकीय पुढारी यांनाच उत्सवात स्थान दिले जाते. समाजाला काय आवडते यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे, ते देण्याचा या उत्सवांच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवा. अनावश्यक व्यय होणारे मनुष्यबळ आणि पैसा समाजहितैषी आणि प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी उपयोगात आणला, तर पुष्कळ काही साध्य करता येऊ शकते.

श्रीगणेशमूर्ती शास्त्रशुद्ध असावी!
गणेशोत्सव काळात श्रीगणेशमूर्ती तसेच श्रीगणेशाचे चित्र विसंगत आणि विडंबनात्मक रूपात आढळून येते. बाहुबली हातात घेतलेला गणपती, मल्हारदेवाच्या रूपातील गणपती, क्रिकेट खेळणारा गणपती, साईबाबांच्या वेशातील गणपती अशा चुकीच्या रूपांत गणेशूमर्ती साकारली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही टाकाऊ वस्तू, चॉकलेट, फळे यांपासून गणेशमूर्ती साकारली जाते, अशीच विद्रुपता श्रीगणेशाच्या चित्रांमध्येही आढळून येते. कधीकधी श्रीगणेशाचे पोट अथवा सोंड मोठ्या आकारात दाखवली जाते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. श्रीगणेशाची मूर्ती अथवा चित्र म्हणजे आपली कलाकुसर दाखवण्याचे माध्यम नाही. गणेशमूर्ती शास्त्रशुद्ध असेल, श्रीगणेशाचे चित्र सात्विक असेल, तरच त्यातून श्रीगणेशाची तत्त्व कार्यरत होते आणि भाविकाला त्याचा लाभ होतो.

विसर्जन शास्त्रानुसार वाहत्या पाण्यातच व्हावे!
श्रीगणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण होते, असा कांगावा केला जातो. काही धर्मद्रोही आणि कथित पर्यावरणवादी संघटनांकडून ‘श्रीगणेशमूर्तींचे दान द्या, त्यांचे कृत्रिम हौदात विसर्जन करा, कागद्याच्या लगद्यापासून श्रीगणेशमूर्ती बनवा, अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करा’, अशाप्रकारे आवाहन केले जाते. वास्तविक हे सर्व प्रकार अवैज्ञानिक आणि फसवे आहेत. ‘कागदाच्या लगद्यामुळे जलप्रदूषण होते’, हे खुद्द हरित लवादानेही मान्य करून ‘कागदी लगद्याच्या गणेशमूतींचा प्रसार व्हावा’, या सरकारी अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. कृत्रिम हौदातील गणेशमूर्तीही हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळ करत कधी खाणीत, तर कधी पुन्हा नदीतच विसर्जित केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. असे करताना मूर्तीचे अवयव भंग पावतात आणि धर्मभावना दुखावल्या जातात. वास्तविक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे, असे शास्त्र सांगते. धर्मद्रोही संघटनांच्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता श्रीगणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यातच विसर्जन करणे श्रेयस्कर आहे. धर्मशास्त्र जाणून घेऊन धर्माचरण करणे, हीच खरी ईश्‍वराची पूजा आहे.

श्रीगणपती ही बुद्धीची देवता आहे. श्रीगणेशाची आराधना करून पाखंडाचे खंडन करणे हीसुद्धा आजच्या काळातील भगवद्भक्तीच आहे. त्यामुळे धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हे वैचारिक प्रदूषण दूर करून लोकांच्या मनामनांत सद्विचारांची पेरणी करायला हवी. ‘या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदू धर्माचरणी आणि संघटित होवोत, उत्सवातील अपप्रकार तसेच धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात परतवून लावण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो आणि लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेल्या सुराज्याची म्हणजेच हिंदू राष्ट्राची स्थापना होवो’, अशी श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!
अभय वर्तक – 7775858387