धर्मादाय रुग्णालयांत 7 हजार गरीब रुग्णांवर उपचार

0

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर तसेच धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने मुंबईतील धर्मादाय रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचली आहेत. बड्या खासगी रुग्णालयांनी 4 नोव्हेंबरला रस्त्यावर, झोपडपट्टी भागातील रुग्णांच्या घरोघरी जाऊन आरोग्याबाबतची तपासणी केली. या मोफत आरोग्य शिबिरात सुमारे 7 हजार 324 गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिरामागचा उद्देश गरीब आणि गरजूंपर्यंत आरोग्याच्या सोयी-सुविधा पोहोचवणे आणि तळागाळातील व्यक्तींना रुग्णालयात मिळणार्‍या सोयी-सुविधांबाबत माहिती करून देणे ही होते.

मुंबईतील रुग्णालयांच्या संघटनेशी संलग्न असलेल्या जसलोक हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, ब्रीजकॅन्डी हॉस्पिटल यांसारख्या 43 रुग्णालयातील डॉक्टरांनी या एक दिवसीय मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेच्या माध्यमातून शहरभरातील 7,324 गरीब रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. शहरभर सुरू असलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 75 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. प्रत्येक रुग्णालयाने दोन ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. तर, मिळालेल्या माहितीनुसार, 80 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णांना मिळाला दिलासा
या मोहिमेबाबत बोलताना रुग्णालयाच्या संघटनेचे डॉ. पी.एम.भुजंग म्हणतात, या आरोग्य मोहिमेने गरीब आणि गरजू रुग्णांचा धर्मादाय रुग्णालयांबाबत विश्‍वास निर्माण होईल की, सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार होत नाहीत. याआधी निर्देश असून धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. त्यामुळे ही रुग्णालये म्हणजे पांढरा हत्ती बनली होती. अखेरीस यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर निर्देश दिल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांनी तातडीने निर्देश देऊन त्यावर अंमलबजावणी सुरू केली.