मुंबई । भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळाला नाही, म्हणून नाराज होऊन मंत्रालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी रविवारी जे.जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आपण अवयवस्वरुप या जगात रहावे या भावनेतून त्यांनी आपले अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे, धर्मा पाटील यांचे नेत्रदान करण्यात आले. रविवारी रात्री जे.जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करून धर्मा पाटील यांचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला लावण्यात आले असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी दिली.
धर्मा पाटील यांच्या डोळ्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे डोळे प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर जे.जे. रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. नेत्रदान करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव कायद्यानुसार गुप्त ठेवण्यात आले आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणार्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेर जे.जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर, योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकर्यांचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले होेते.
3 दिवस डायलिसीसवर होते धर्मा पाटील
मंत्रालयाच्या पायर्या झिजवणार्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर धर्मा पाटील यांचे तीन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. पाटील यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर फडणवीस सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
जोपर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, तसेच जोपर्यंत त्यांना ‘शहीद भूमिपुत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली होती, सरकारने धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी वडीलांचा मृतदेह स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
धर्मा पाटील यांच्या मृतदेहासह पाटील कुटूंबीय धुळ्याला रवाना
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. तसेच जमिनीच्या फेरमूल्यांकनाची घोषणाही त्यांनी केली होती. तसे लेखी आश्वासन बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना पाठविल्यानंतर पाटील यांनी जे.जे. रुग्णालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. पाटील यांनी वडील धर्मा पाटील यांचा मृतदेहही ताब्यात घेतला असून त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी धुळ्याला निघाले आहेत. दरम्यान, धर्मा पाटील यांना ’शहीद भूमिपूत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचे कोणतेही लेखी आश्वासन सरकारने दिलेले नाही.