धुळे । शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी धर्मा पाटील (वय-80) यांच्यावर त्यांच्या विखरण या मुळगावी सकाळी 11 वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण विखरण गावातील गावकर्यांसह सर्वपक्षीय नेते या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.यावेळी राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मंत्री जयकुमार रावल हे देखील या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शासनाकडून, योग्य दाद मिळत नसल्याने हतबल झालेले धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज संपूर्ण विखरण गावसह परिसर शोकसागरात बुडाला होता.