धर्मेंद्र, विजय चव्हाण यांना जीवनगौरव!

0

राज्य शासनाचे पुरस्कार घोषित; 55 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात गौरविणार
राजकुमार हिराणी, मृणाल कुलकर्णीही मानकरी

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांतारामम पुरस्कारांची घोषणा रविवारी करण्यात आली. यांपैकी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या 55व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रसिकांच्या हृदयावर चार दशके अधिराज्य
विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टी गाजविली आहे. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भुमिका प्रचंड गाजल्या आहेत. मोरुची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक होय. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला आहे. विजय चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयावर चार दशके अधिराज्य केले.

स्वत:ची वेगळी ओळख
मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रमा माधव या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना स्वामी या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राजवाडे अँड सन्स, कशाला उद्याची बात, यल्लो या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भुमिका साकारल्या आहेत. त्यासोबत आशिक, रास्ता रोको, छोडो कल की बातें, मेड इन चायना या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली.

अ‍ॅक्शन हिरो धर्मेद्र
1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आता पर्यंतसुमारे 250 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 1976 ते 1984 च्या काळात त्यांनी अनेक अ‍ॅक्शनपट केले. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादों की बारात या चित्रपटांमुळे ते अ‍ॅक्शन हिरो म्हणून नावजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट ठरली.

राजकुमार हिरणींची यशस्वी वाटचाल
राजकुमार हिराणी यांचा जन्म 1962 साली नागपूर येथे झाला असून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी त्यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली. त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनंतर त्यांनी लगे रहो मुन्ना भाई व 3 इडियट्स या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सिने-पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज कपूर जीवनगौरव
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

राज कपूर विशेष योगदान
दिग्दर्शक राजकुमार हिराणी

व्ही. शांताराम जीवनगौरव
अभिनेते विजय चव्हाण

व्ही. शांताराम विशेष योगदान
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी