धानाच्या भरडाईसाठी प्रतिक्विंटल ३० रूपयांचा वाढीव दर

0

मुंबई – राज्यात शेतकऱ्यांचा संप चालू असतानाच राज्य सरकारने धानाची भरडाई ३० रूपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप व रब्बी पणन हंगामामधील (2016-17) खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रूपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रूपये वाढीव भरडाई दर देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धानाच्या भरडाईसाठी मिलर्सना क्विंटलमागे 40 रुपये मिळणार आहेत.

आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य शासन धान्याची आधारभूत किंमतीने खरेदी करते. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई मिलर्सकडून करून घेऊन मिळणारा तांदूळ (CMR-Custom Milled Rice) भारतीय अन्न महामंडळाकडे जमा करण्यात येत होता. चालू हंगामापासून हा सीएमआर गिरणीमालकांमार्फत शासकीय गोदामात जमा करण्यात येत आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र शासनातर्फे भारतीय अन्न महामंडळाच्या मार्फत करण्यात येते. धान भरडाईकरिता कच्च्या तांदळासाठी दहा रुपये व उकडा तांदळासाठी वीस रुपये प्रति क्विंटल असा दर देण्यात येत आहे. केंद्र शासनाने या दरात 2005-06 पासून सुधारणा केलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या खरीप पणन हंगामाकरिता (2015-16) केंद्र शासनाकडून निश्चित केलेल्या दहा रुपये प्रति क्विंटल दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून भरडाई दरात प्रति क्विंटल तीस रूपये वाढ करण्यात आली होती. भरडाई दर वाढविल्याने त्यावर्षी एकूण धान खरेदीच्या 96.67 टक्के धानाची भरडाई झाली आहे. सन 2016-17 मधील संभाव्य खरेदी सुमारे 70 लाख क्विंटल गृहित धरण्यात आली असून त्यासाठी येणाऱ्या 21 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.