धानोरा गावठाण शिवारात वॉश आऊट : दिड लाखांची गावठी दारू नष्ट

जळगाव : जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील धानोरा वनीकरण गावठाण शिवारात जळगाव तालुका पोलिसांनी वॉश आऊट मोहिमेंतर्गत एक लाख 54 हजार शंभर रुपयांच्या गावठी दारूसह रसायन नष्ट केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी सोपान दिगंबर सोनवणे व राहुल धोंडू पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दोन्ही संशयीत आरोपी हे गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी धाव घेत जळत्या चुलीवरील गुळ मोह नवसागर मिश्रित कच्चे पक्के सायनसह 22 ड्रममधील तब्बल चार हजार पाचशे लिटर रसायण व गावठी हातभट्टीची 90 लिटर दारू मिळून एक लाख 54 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. दरम्यान, ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, अशोक पाटील, महेंद्र सोनवणे आदींच्या पथकाने केली.