Immersion Procession In Dhanora Town Defaced : Mob pelt stones after police lathi charge धानोरा, ता.चोपडा : श्री विसर्जन मिरवणुकीत वाद बंद करण्यावरून वाद वाढल्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केल्यानंतर जमावानेही दगडफेक केली. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली. दरम्यान, विसर्जन मिरवणुक शांततेत सुरू असून सुद्धा पोलिसांकडून दबंगगिरी केली गेल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या भूमिकेने तीव्र नाराजी
धानोरा, ता.चोपडा येथे गणपतीची विसर्जन मिरवणूक पाचव्या दिवशी म्हणजेच रविवार, 4 रोजी दुपारी दोन वाजता शांततेत सुरु झाली होती. मिरवणूक सुरू असताना पोलिसांकडून वारंवार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येत होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत देखील बसवले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलिसांप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. रात्री दहा वाजता मिरवणुक ही मशिद जवळुन जात असतांना दोन मंडळ पार झाली होती. तिसरे मंडळ ओम गणेश मंडळ जात असतांना वाद्य बंद करा असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या सुचनेने गणेशभक्त नाराज झाले. यावेळी काही गणेशमंडळांनी जागेवरच ठिय्या मांडला.
शाब्दीक वाद वाढताच लाठीचार्ज
गणेश मंडळ पुढे जात नसल्याने सपोनि दांडगे व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्याने पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. यात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील यामुळे इजा झाली. अचानक झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच पळापळ झाली व सर्वत्र अशांतता पसरली. परीस्थिती गंभीर होत असल्याने जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचे सांगण्यात आले तर या घटनेत काही गणेशभक्त जखमी झाले असून दोन फोर व्हिलर आणि काही दुचाकींचे नुकसान झाले.
नऊ जण जखमी
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने 9 लोक जखमी झाले असून त्यात 2 बालकांचा समावेश असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रात्री 12 वाजेच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. महसूलचे एक अधिकारी आणि एक पंचायत समिती सदस्य ग्रामस्थांची समजूत घातली.