धारागीर गावाजवळ बस-कारचा अपघात; एक ठार, चार जखमी

0

मयत हे औरंगाबाद येथील शाखा अभियंता
एरंडोल – एरंडोल पासून जवळ असलेल्या धारागीर गावाजवळील साई हॉटेलजवळ धुळ्याकडून जळगावकडे जाणारी विनावाहक बसने समोरून येणाऱ्या भरधाव कारला जोरदार धडक दिल्याने कारच्या डाव्या बाजूला बसलेले सहाय्यक अभियंता यांचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह इतर तीन महिला जखमी झाल्याची घटना सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली असून जखमी झालेल्या चौघांना एरंडोल येथील कल्पना हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

माऊंट अबू येथे जाण्यासाठी निघालेल्या दोन कार सकाळी पाच वाजेच्या सुमारास औरंगाबादहुन जळगावमार्गे निघाल्या होत्या. यातील एक कार पुढे निघून गेली होती. सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास धारागीर गावाजवळील साई हॉटेलजवळ धुळे-जळगाव विनावाहक बस क्रमांक (एमएच 14 बीटी 2042) जळगावकडे जात असताना समोरून येणारी कार (एमएच 20 ईवाय 2863) या कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील बसलेले सहाय्यक अभियंता दिलीप सोपानराव घाडगे रा.लक्ष्मीनगर, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्यामागे, गारखेडा परिसर, औरंगाबाद हे जागीच ठार झाले तर चालकासह मागे बसलेल्या तीन महिला गंभीर जखमी झाले. त्यांना चौघांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार कारमधील परिवारांनी एरंडोलगावातील हायवेजवळी एका हॉटेलवर नास्ता व चहापाणी केला असल्याचे माहिती जखमी यावेळी दिली. धारागीर गावातील नागरीकांनी घटनस्थळी धाव घेवून मदत कार्य केले. पोलीस पाटील दिलीप राधो, इश्वर संतोष पाटील, संतोष पाटील आणि राकेश पाटील यांनी जखमींना मदत करून खासगी वाहनाने एरंडोल येथील कल्पना हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.