मुंबई । शिवशक्ती भीमशक्ती भाजप युतीतून रिपब्लिकन पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आलेले साबरेड्डी मल्लेश बोरा यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाची मोठी हानी झाली आहे. दिवंगत साबरेड्डी बोरा हे अत्यंत साधे प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्यांचे धारावीतील एखाद्या रस्त्यास नाव देण्यासाठी तसेच त्यांच्या स्मरणार्थ सभागृह रूपाने स्मारक उभारून त्यांच्या स्मृती जोपासण्यात येईल, असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. दिवंगत साबरेड्डी बोरा यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त, महापौर आणि स्थायी समितीला प्रस्ताव पाठवणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
धारावी मुकुंदराव आंबेडकरनगर येथे रिपाइंचे दिवंगत माजी नगरसेवक साबरेड्डी बोरा यांच्या श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी खासदार एकनाथ गायकवाड, रिपाइंचे महाराष्ट्र अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार बाबुराव माने, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, चंद्रकांत कसबे, काकासाहेब खंबाळकर, बाळासाहेब मिरज, डी. एम. चव्हाण, डॉ. हरीश अहिरे, घनश्याम चिरणकर, साधू कटके, चिंतामण गांगुर्डे, हेमंत रणपिसे, अश्विन वाघ, दिनेश विनेरकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिवंगत साबरेड्डी बोरा यांच्या उपस्थित कुटुंबीयांचे ना रामदास आठवलेंनी सांत्वन केले. दिवंगत साबरेड्डी बोरा हे मूळचे कर्नाटक मधील गुलबर्गा जिल्ह्यातील मादीगा चेन्नया समाजाचे कार्यकर्ते होते. अवघ्या 50 व्या वर्षी साबरेड्डी बोरा यांचे 24 जानेवारी रोजी निधन झाले.