नवी दिल्ली:सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. याकाळात गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहे. भारतातील अनेक सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाहीये, असे असले तरी अनेक देशांमध्ये धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिल्याने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. अनेक ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण कोरियाचा उल्लेख करताना अनेक देशांनी संसर्ग रोखण्यात यश मिळवले होते, पण लोक संपर्कात येणं पुन्हा सुरु झालं असल्याने रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. करोना विषाणूंना संधी मिळेल तिथे लगेच फैलाव होणार असं सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्ग रोखण्यासाठी शक्य ते सर्व करा असं आवाहन सर्व देशांना केलं आहे.
भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाख २५ हजार २८२ वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १४ हजार ८२१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४४५ करोनाबळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १३ हजार ६९९ झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ३७ हजार १९५ रुग्ण बरे झाले. गेल्या २४ तासांमध्ये ९,४४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात १ लाख ७४ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.