गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत यावल पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या ; टिक टॉकवरील व्हिडिओ शेअर करणे पडले महागात
यावल- टीक टॉक या सोशल मिडीयावरून बनवलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून एका समाजाच्या धार्मिक दुखावल्या प्रकरणी यावलमधील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तत्पूर्वी या क्लीपमुळे संतप्त समाजबांधवांनी मंगळवारी रात्री यावल पोलिस ठाण्यात ठिय्या देत संताप व्यक्त करीत आरोपीच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात करीत जमावाला शांत केले. तिघाही आरोपींविरुद्ध यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल क्लीपनंतर समाज संतप्त
मंगळवारी एका सोशल मिडीयाच्या ग्रुपवर एका समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा व्हिडीओे व्हायरल झाला. ज्याने तो टाकला तो शहरातील रहिवासी तरुण असल्याने व मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही बाब संबधीत समाजातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने समाजबांधव मंगळवारी रात्रीचं थेट पोलिस ठाण्यात धडकले. रात्री दिड वाजेपर्यंत नागरीकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरेे यांनी जमावाची समजुत काढत या प्रकरणी मो. अकील अहेमद खाटीक यांच्या फिर्यादीवरून सागर राजेंद्र बारी, सौरभ उर्फ मुन्ना किशोर भोइटे व शुभम मिलिंद सांगवीकर (सर्व रा.भोईटे गल्ली, सरस्वती शाळा) या तिघांवर टिकटॉकवर धार्मिक भावना दुखावतील अशा पध्दतीची व्हीडीओ तयार करून व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे. दरम्यान, यावल शहरातील सुदर्शन चौकात शीघ्रकृती दलाच्या जवानांंचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.