जळगाव। नवीन नोकरीवर रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला पुण्याहून मुंबईकडे जाणार्या इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीमधून पडून तुषार संजय चिंचोले (वय 28, रा. स्नेहल बिल्डिंग, प्रतापनगर, जळगाव) या तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी खंडाळा घाटातील मंकिहील ते ठाकूरवाडी दरम्यान घटना घडली. तुषार हा राष्ट्रीय खेळाडूही होता. चार दिवसापूर्वीच तो जळगावातून पुण्यात गेला होता.
पुण्याकडून मुंबईला जात होता तुषार
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुषार हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला होता. ती नोकरी सोडल्यानंतर मुंबईत त्याने नोकरीसाठी प्रयत्न केले, त्यात त्याला यश आल्यानंतर मंगळवारी 1 ऑगस्टपासून तो नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू होणार होता. सोमवारी सायंकाळी पुण्याहून मुंबईला इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने जात असताना खंडाळा घाटातील मंकी हिल जवळ किमी 115/07 या खांबाजवळ तुषार हा चालत्या गाडीतून खाली पडला. त्या लोखंडी पोलचा डोक्याला फटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ओळखपत्रावरुन पटली ओळख
हा अपघात झाला तेव्हा त्याची बॅग रेल्वेतच राहिली होती. ही बॅग व अपघाताची माहिती सहप्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांना दिली. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्याची ओळखच पटत नव्हती.बॅग हाती लागल्यानंतर त्यातील कागदपत्रांची पडताळणी केली असता ओळखपत्र, आधारकार्ड व अन्य कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम.एम.पठाण हे करत आहेत.
वडिलांना आला फोन
लोणावळा पोलिसांनी ओळख पटविल्यानंतर पहाटे चार वाजता तुषारचे वडील डॉ.संजय चिंचोले यांना मोबाईलवर कॉल करुन अपघाताची माहिती दिली. त्यांनी लागलीच मुंबईत राहणारी मुलगी शितल व जावई पराग वाच्छानी यांना ही माहिती दिली. जावई व मुलगी मुंबईहून तर जळगावहून वडील तातडीने लोणावळा येथे रवाना झाले. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी मृतदेह जळगावात आणण्यात आला.तुषार हा डॉ.संजय चिंचोले यांचा एकुलता मुलगा होता. मोठी मुलगी शितल विवाहित असून मुंबईत स्थायिक आहे. आई मिनाक्षी या रोझलॅँड स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. चिंचोले कुटुंब मुळचे चिंचोली, ता.जळगाव येथील आहे.