Standing at the door of Kushi Nagar Express risked his life : Death of a youth from Barhanpur भुसावळ : बर्हाणपूर येथून भुसावळकडे कुशी नगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभा राहून प्रवास करीत असलेला प्रवासी हलीमखान जाफरखान तापडीया (21, रा. बर्हाणपूर) हा झोल गेल्याने धावत्या गाडीतून खाली पडल्याने मयत झाला. ही घटना रविवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली.हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गाडीची चेन ओढून गाडी थांबविली. तरुणाचा मृतदेह गोवा एक्स्प्रेसने भुसावळ येथे आणण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू
लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी बर्हाणपूर येथून हलीमखान हा त्याच्या मित्र व नातेवाईकांसह कुशी नगर एक्स्प्रेस गाडीने भुसावळकडे येत होता. गाडीने सावदा स्थानक सोडल्यावर दरवाजात उभ्या असलेल्या हलीमखान याचा झोल गेल्याने तो धावत्या गाडीतून थेट गाडीच्या खाली पडला. गाडी वेगात असल्याने त्याचा मृतदेह हा जवळच असलेल्या झाडांमध्ये पडला. यावेळी सोबतच्या लोकांनी गाडीची चेन पुलिंग करून गाडी थांबवली मात्र लवकरच हलीमखानचा मृतदेह सापडला नसल्याने गाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोवा एक्स्प्रेसने आणला मृतदेह
हलीमखान यांचे मित्र व नातेवाईक यांनी त्याचा मृतदेहाचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह हा गवतात पडलेला सापडला. त्याला जबर मार लागला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हा गोवा एक्स्प्रेसने भुसावळ येथे आणला, मृतदेहाचे विच्छेदन ग्रामीण रूग्णालयात डॉ. मयुर चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी केले. यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपविला. नातेवाईक बर्हाणपूर येथे मृतदेह घेऊन सायंकाळी गेले.
पोलिस घटनास्थळी रवाना
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय साळुंखे, सहायक फौजदार प्रदीप राणे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पोलिस निरीक्षक घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत हलीमखान यांच्या नातेवाईकांचे, मित्रांचे जबाब नोंदविले. यावेळी निरीक्षक घेरडे यांनी नातेवाईकांशी चर्चा करीत घडलेला प्रकार कसा घडला हे जाणून घेतले.