जळगाव । मुंबईला परिक्षा देण्यासाठी गेलेला तरूण भुसावळला घरी परतत असतांना त्याचा रेल्वेतून पडून दूर्दैवी अंत झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. तुषार भटू गवळे (वय-28) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाच्या मृतदेहास गुरूवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला.
मुंबईहून परतत होता घरी
तुषार हा भुसावाळ येथील पीएचओ कॉलनीत कुटूंबियांसोबत राहत होता. तर दिपनगर येथे कंत्राटी पध्दतीने अकांऊटंट या पदवार कार्यरत होता. दरम्यान, तुषारे याचे वडील हे रेल्वेत नोकरीला आहेत. मंगळवारी तुषार सिलीकॉन प्रा.लि. कंपनीतील परिक्षेसाठी मुंबईला गेलेला होता. परिक्षा दिल्यानंतर तो बुधवारी सायंकाळी मुंबई-विदर्भ एक्सप्रेसने भुसावळला येण्यासाठी निघाला. दरम्यान, मुलगा कुठं पर्यंत पोहोचला हे विचारण्यासाठी बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजता वडील भटू गवळे यांनी तुषार याला फोन करून विचारपूस केल्यानंतर गाडी पाचोर्याच्या पूढे असल्याची माहिती तुषारने त्यांना दिली. रेल्वे भुसावळात 2.30 वाजेला पोहोचते. परंतू 2.30 वाजून सुध्दा मुलाचा फोन आला नाही म्हणून भटू गवळ यांनी पून्हा तुषारच्या मोबाईलवर फोन लावला.
रूळाजवळ मिळाला मृतदेह
रिंगच जात असल्याने तुषार फोन उचलत नसल्याने त्यांच्या मनात शंका आली. त्यांनी लागलीच कुटंबियांनासोबत घेऊन भुसावळ रेल्वेस्टेशन गाठत रेल्वेपोलिसात मुलाची माहिती दिली आणि परिसरात त्याचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. अखेर भुसावळ रेल्वेस्टेशनच्या पुढे काही अंतरावर आऊटरजवळ तरूणाचा मृतदेह सापडल्याची माहिती रेल्वे कर्मचार्यांनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी तरूणाला पाहिल्यानंतर तो तुषारच असल्याचे कळताच कुटूंबियांनी त्या ठिकाणी हंबरडा फोडला. त्यानंतर गुरूवारी सकाळी तुषारचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी एकच गर्दी करत आक्रोश केला. दरम्यान, तुषारला झोप लागल्याने त्याला भुसावळ आले हे कळलेच नसावे स्टेशनच्या काही अंतरावर कळल्यानंतर तो धावत्या रेल्वेतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला असावा असे नातेवाईकांनी सांगितले.
रेल्वेखाली आल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू
जळगाव- खंडेरावनगर परिसरातील रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री 7 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली. राजेंद्र गंगााम पाटील वय-35 असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खंडेरावनगरातील रहिवासी रिक्षाचालक राजेंद्र गंगाराम पाटील यांचा खंडेरावनगर परिसरातील रेल्वेखांबा क्रं. 417 ते 422 दरम्यान बुधवारी रात्री 7ते 8 वाजेच्या दरम्यान धावत्या रेल्वेखाली22 येवून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरूवारी सकाळी नातेवाईक पोलिस ठाण्यात आल्यानंतर राजेंद्र पाटील यांची ओळख पटली. यानंतर याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रौढाचा मृत्यू
जळगाव- रेल्वेखाली आल्याने अनोळखी प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी आसोदा रेल्वेगेटजवळ घडली आहे. मृत प्रौढास शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी आसोदा रेल्वे गेटजवळ चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील प्रौढाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी मृतदेह वाहनातून आणत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केला.