धुक्यामुळे मध्य रेल्वे ठप्प, वासिंदमध्ये प्रवाशांचा रेल रोको

0

शहापुर । मुंबईसह परिसरात बहुतांश ठिकाणी शनिवारी पहाटेपासूनच दाट धुके पसरले होते. त्यातच कडाक्याची थंडी होती. त्याचा परिणाम थेट रेल्वे सेवेवर पडल्याची घटना घडली. कमी दृश्यमानतेमुळे पहाटे उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले. मध्य रेल्वेच्या वासिंद स्थानकावर मुंबईकडे जाणारी लोकल आलीच नाही, म्हणून सकाळी सातच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी थेट रेल रोको सुरू केला. वासिंद स्थानकावरील रेल रोकोनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी आवाहन करत प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केले. तब्बल दीड तासांनी 8.25 च्या सुमारास पहिली लोकल वासिंदहून मुंबईसाठी रवाना झाली. मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 40 ते 50 मिनिटे आणि पश्‍चिम रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. विरार ते बोरीवलीदरम्यान धुक्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत, अशी उद्घोषणाही रेल्वे स्थानकांत सुरू होत्या.

रेल्वे अधिकार्‍यांमध्ये चर्चा
वासिंद रेल्वे स्थानकात जेव्हा रेल रोको आंदोलन प्रवाशांनी सुरू केले, त्यावेळी रेल्वे कमर्शियल निरीक्षक सुर्यप्रकाश, रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, जीआरपी-आरपीएफ निरिक्षक यांची ऑपरेटर रूममध्ये चर्चा झाली. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी रेल्वे प्रवाशांना माहितीसाठी एक प्रसिध्दी पत्रक जारी केले त्यानंतर रेल्वे रोको मागे घेउन पुन्हा रेल्वे सुरळीत झाली.

कल्याणपुढे सिग्नलही अदृश्य
या प्रसंगी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना सांगितले की, कल्याणपासून पुढे धुक्याचे प्रमाण अतिशय दाट होते, त्यामुळे मोटरमनना सिग्नलही दिसत नव्हते, परिणामी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोकल हळू चालवत असल्याने लोकल उशिरा धावत होत्या. कुठल्याही मेल एक्सप्रेसला प्राथमिकता देऊन लोकल आधी सोडण्यात आलेले नाही. उलट प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही पाच मेल एक्स्प्रेस प्रत्येक स्टेशनवर थांबवल्या आहेत. त्यामुळे आम्ही रेल्वे प्रवाशांना पुन्हा एकदा विनंती करीत आहोत की, दाट धुक्यामुळे लोकल त्यांच्या नेहमीच्या वेगात प्रवाशांच्या सुरक्षेकरीता चालविता येत नाही.