धुळयात हवालामार्गे जाणारी साडेतेवीस लाखांची रक्कम पकडली

0

दोघे चौकशीकामी ताब्यात ; महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या कारवाईने चर्चेला उधाण

धुळे- महापालिका निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे फटाके दररोज फुटत असतानाच इंदौरहून मुंबईकडे हवालामार्गे रोकड नेली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गोपनीय कारवाईत 23 लाख 50 हजारांची रोकड मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात सोमवारी पहाटे जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांना चौकशीकामी ताब्यात घेतले असून त्यांनी ही रोकड इंदौरच्या लालाभाई या व्यापार्‍याची असल्याची माहिती दिली आहे तर पोलिसांना ही रक्कम हवालामार्गे नेली जात असल्याचा दाट संशय असल्याने त्यांनी खोलवर चौकशी करीत आयकर विभागाला पत्र दिले आहे.

गोपनीय माहितीनंतर पोलिसांची कारवाई
इंदौरहून हवालामार्गे चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रोकड नेली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर सोनगीर तसेच अवधान फाटा येथे सापळा रचण्यात आला. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांची तपासणी सुरू असताना भरधाव वेगात मुंबईकडे जाणारी मारूती सियाज चारचाकी (एम.पी. 09 सी.आर 6099) अडवण्यात आल्यानंतर तिची बारकाईने तपासणी केल्यानंतर मागच्या सीटच्या मधोमध बनवण्यात आलेल्या गुप्त कप्प्यात 23 लाख 50 हजारांची रोकड आढळली. उभयंतांची याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना चारचाकी व रोकडसह ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

इंदौरच्या लालाभाईंची रक्कम
पोलिसांनी चारचाकी वाहनातून मुकेशभाई गोविंदभाई पटेल (36, रा.1320, सी विंग, सीपी टँक सर्कल, भोलेश्वर, मुंबई) तसेच सहदेव जयवंत सुर्वे (30, इंद्रजीत यादव चाल, गणेश नगर, पम्प हाउस, अंधेरी पूर्व) यांना ताब्यात घेतले असून त्यांनी ही रक्कम इंदौरच्या लालाभाईंची असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धुळे आयकर विभागाला पत्र देवून माहिती कळवली आहे तर हवालामार्गे ही रक्कम जात असल्याचा पोलिसांना संशय असून याबाबत कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या कारबाबत संशय असल्याने त्यांनी सोनगीरपासून वाहनाचा अवधान फाट्यापर्यंत पाठलाग केला. पोलिसांनी दहा लाख रुपये किंमतीच्या चारचाकीसह 23 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली असून त्यात पाचशे, दोनशे व शंभर रुपये दराच्या नोटा आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, रामकृष्ण सोनवणे, संदीप थोरात, धनंजय मोरे, मायुस सोनवणे, गौतम सपकाळे, प्रवीण पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, रवीकुमार राठोड, विशाल पाटील, दीपक पाटील, केतन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.