धुळे जिल्ह्यातील टंचाईच्या कामांना अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्राधान्य द्यावे

0

धुळे । उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकारी व कर्मचार्‍यांनी दक्ष राहत पाणीपुरवठ्यासह टंचाईच्या कामांना प्राधान्य द्यावे. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी पाणी टंचाई जाणवणार्‍या गावांचा दौरा करुन सर्व जलस्त्रोतांची पडताळणी करुन टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पाणी व चारा टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे (शिरपूर), तहसीलदार संदीप भोसले (साक्री), सुदाम महाजन (शिंदखेडा), रोहिदास वारुळे (दोंडाईचा), धुळे महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

9 गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा
जिल्ह्यात सध्या दहा गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून आणखी 50 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेतर्फे गस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच जुलै 2018 पर्यंत जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

समन्वयाने काम करा
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, टंचाईच्या काळात अधिकार्‍यांनी समन्वयाने कामे करावीत. एकमेकांच्या संपर्कात राहावे. टँकरच्या फेर्‍यांचे सनियंत्रण करण्यासाठी ग्राम पातळीवर समिती गठित करावी. हातपंप दुरुस्ती पथक तत्काळ कार्यान्वित करावे. या पथकांना आवश्यक ते साहित्याचा पुरवठा करावा. या पथकाने कार्यरत रहात हातपंपांची दुरुस्ती करावी. पाणी टंचाईच्या काळात नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा.