धुळे जिल्ह्यात १२ एप्रिलनंतर मोफत तांदूळच्या वितरणास सुरवात

0

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणार पाच किलो मोफत तांदूळ : रमेश मिसाळ

धुळे। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र सरकारने पात्र लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून २०२० करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या-त्या महिन्यात वितरण होईल. एप्रिल २०२० करीता मोफत तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम, मनमाड यांच्याकडून प्राप्त करून घेतले जात असून १२ एप्रिलनंतर स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून वितरणास सुरवात होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी सांगितले.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्न धान्याचे वितरण पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे. त्यात एप्रिल २०२० मध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. e-POS मशीनवर एप्रिल २०२० करीता वितरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत दिलेल्या तांदळाचे (प्रति व्यक्ती पाच किलो) लाभार्थ्यांना e-POS द्वारे मोफत वितरण करण्यात येईल. या तांदळाचे वाटप करताना लाभार्थ्यांनी त्या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खातरजमा केली जाईल.

अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना देखील प्रती सदस्य दरमहा पाच किलो या प्रमाणात मोफत तांदूळ वितरीत करण्यात येईल. (अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेवर १ सदस्य असल्यास पाच किलो आणि दोन सदस्य असल्यास १० किलो या प्रमाणे तांदळाचे वितरण करण्यात येईल.) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनादेखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या ५ किलो प्रति सदस्य या परिमाणात अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर प्रति सदस्य ५ किलो तांदळाचे वितरण करण्यात येईल. मोफत अतिरिक्त तांदळाचे वितरण e-POSद्वारेच होईल.

माहे एप्रिल २०२० साठी अंत्योदय योजनेसाठी अन्न धान्य परिमाण ३५ किलो (२६ किलो गहू व ९ किलो तांदूळ )असे असुन माहे मे २०२० आणि जून २०२० साठी अन्न धान्य परिमाण ३५ किलो(२१ किलो गहू व १४ किलो तांदूळ)असे राहील व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांकरीता प्रति युनिट पाच किलो (तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ) अन्नधान्य मिळेल. मे व जून २०२० मध्ये त्या-त्या महिन्याचे अन्नधान्य आणि अतिरिक्त मोफत तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून त्या- त्या महिन्यात प्राप्त होईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी सांगितले.