धुळे तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे सुरु

0

धुळे। तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान जोमाने सुरु असून आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामाला गती देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार अमोल मोरे हे जातीने या कामावर लक्ष ठेवून असून मुदतीच्या आत कामे पुर्ण करुन जलयुक्त शिवार अभियानाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचा निर्धार या अधिकार्‍यांनी घेतला आहे.

प्रांताधिकार्‍यांनी केली पाहणी
या कामाअंतर्गत 100 फुट बोअर घेऊन त्यामध्ये 10 फुट केसींग पाईप टाकतात व त्या पाईपला छोटे छोटे छिद्र पाडतात व त्याच्या चारही बाजूने दगड धोंडे टाकतात. त्या पाईप मधून 100 फुट खोली पर्यत पाणी जमीनीमध्ये मुरते व भुजलपातळीत वाढ होऊन त्याचा खुप मोठा फायदा परिसरातील विहिरींना व पाणीपुरवठ्याच्या विहीरीला होतो. या कामाची नुकतीच प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार अमोल मोरे यांनी जुन्नेर परिसरात पाहणी केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सोनवणे,उपअभियंता ए.बी.पाटील, पदाधिकारी गवळी हे उपस्थित होते.

90 कामे झाली पूर्ण
धुळे तालुक्यात पाडळदे, जुन्नेर, निमडाळे, जुनवणे, हडसुणे,तांडा कुंडाणे, कुंडाणे(वेल्हाणे), हेंद्रुण या 8 गावात प्रत्येकी 15 रिचार्ज शाफ्टची अशी एकूण 120 कामे मंजूर आहेत. त्यासाठी 37 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यातील 90 कामे पुर्ण झाली आहेत तर बाकीची कामेही प्रगतीपथावर आहेत.