सहा ग्रामपंचायतींवर फुलले कमळ तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता
धुळे- तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहा ग्रामपंचायती भाजपाच्या तर सात ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या तसेच एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळाली. निवडणुकीचे निकाल गुरूवारी दुपारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती व जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले. बुधवारी जिल्ह्यातील 74 ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी सकाळी 10 वाजता येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली. अवघ्या दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आले.
या ग्रामपंचायतीत मिळाले राष्ट्रीय पक्षांना यश
तालुक्यातील निमगूळ, लामकानी, रानमळा, धाडरी, धाडरे, सौंदाणे व नंदाळे बु॥. या सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. अनकवाडी, अंचाळे तांडा, नावरी, शिरढाणे प्र.डां., जापी व नाणे या सहा ग्रा.पं.वर भाजपचे उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत. कुसुंबा या तालुक्यातील एकमेव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला.