धुळे पाटबंधारे विभागाच्या लघु तलावातून पाणी चोरी

0

नंदुरबार । धुळे पाटबंधारे विभागांतर्गत वावद लघु तलावातून चुकीच्या व व्यापगत झालेल्या परवानगी पत्रावरून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून विभागाच्या शाखा अभियंत्यांनीच या पाणीचोरीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली असून चौकशी अधिक्षक अभियंता सुनिल वंजारी हे प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देणार आहेत.

चार महिन्यांपासून पाण्याचा बेकायदेशीर उपसा
विभागाचे प्रभारी उपअभियंता एम.बी.पाटील व आंबेबारा शाखेचे अभियंता मोरे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून डिसेंबर 2017 मध्ये कार्यकारी अभियंता धुळे यांची पूर्वपरवानगी न घेता सुमारे 15 शेतकर्‍यांना तात्पुरत्या सिंचनाची परस्पर परवानगी दिली. या तात्पुरत्या परवानगी पत्राचा आधार घेऊन पाणीचोरी करणार्‍या शेतकर्‍यांनी विद्युतपुरवठा देखील मंजूर करून घेतला. काहींनी आकडी टाकून इलेक्ट्रीक मोटारी बसवून गेल्या 4 महिन्यांपासून बेकायदेशीर पाण्याचा उपसा करून वावद लघु तलाव कोरडा केला आहे. परवानगीपत्रानुसार 1 मार्च ते 30 जूनच्या दरम्यान पाणी उचलता येणार नाही, अशी अट असतांना गेल्या 5 महिन्यांपासून सर्रास पाणी उचलून करारनाम्यांचे व अटी-शर्तीचे उल्लंघन केले आहे. संबंधीत शाखा अभियंता सुट्टी टाकून गेल्याचे वृत्त आहे. तर प्रभारी उपअभियंता एम.बी.पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. 5 फुट खड्डा करून व 5 एच.पी.च्या इलेक्ट्रीक मोटारीची परवानगी असतांना तलावाच्या जमिनीत 200 फूट विंधनविहिर करून व सुमारे 20 एच.पी.च्या इलेक्ट्रीक मोटारी लावून पाणी उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. काही शेतकर्‍यांनी 3 ते 4 किलोमीटर बेकायदेशीर पाईपलाईन टाकून नगदी पिकांसाठी पाणीचोरी केल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांना पाणी चोरीबाबत सूचित करण्यात आले असून प्रसंगी गुन्हा नोंदविणेबाबत कळविण्यात आले आहे.