धुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे

0

भुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या रीक्त जागी पांढरे यांची बदली झाली आहे.

अन्य बदली झालेले अधिकारी व बदलीचे ठिकाण असे- औरंगाबाद पोलीस उपायुक्त सी.के.मीना यांची औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी, मुंबई शहर पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी, वर्धा पोलीस अधीक्षक निसार तांबोळी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी, पुणे लोहमार्ग अधीक्षक बसवराव तेली यांची वर्धा पोलीस अधीक्षकपदी, मुंबई शहर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांची औरंगाबाद शहर पोलीस उपायुक्तपदी, अकोला प्राचार्य प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य सुनील भारद्वाज यांची मुंबई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तपदी, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी, हिंगोली अपर पोलीस अधीक्षक संजय सुरगौडा यांची ठाणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षकपदी, नाशिक पोलीस अकादमीच्या अपर पोलीस अधीक्षक लता फड यांची औरंगाबाद विभाग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी, राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त डी.के.साकोरे यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी, वाशिमचे अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी, नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक पंकज डहाणे यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली. दरम्यान, धुळे पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंडे यांची बदली झाली होती मात्र त्यांची बदली रद्द करून विश्‍वास पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंडे यांची 27 जुलै रोजी बदली झाली मात्र त्यांनी धुळ्याचा पदभार स्वीकारला नव्हता.