उपशिक्षकाच्या थकीत पगारासाठी स्वीकारली 15 हजारांची लाच
धुळे- महापालिका शाळेतील उपशिक्षकाचा पाच महिन्यांचा पगार काढण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्या धुळे मनपाचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र शेषराव जाधव यांच्यासह लिपिक आनंद बापूराव जाधव यास सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धुळे एसीबीच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर आयुक्त जाधव यांच्या औरंगाबादमधील जाफ्राबादरोडवरील निवासस्थानाची झडती घेण्यात आली मात्र काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपशिक्षकाच्या तक्रारीनंतर सापळा यशस्वी
मनपा शाळेत उपशिक्षक म्हणून असलेल्या तक्रारदाराचा एक लाख 65 हजार 609 रुपये पगार थकीत असल्याने तो मिळण्यासाठी त्यांनी उपायुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे लेखी अर्ज केला होता मात्र पगार अदा करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी लिपिक आनंद जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. सकाळपासून पथक आरोपींना पकडण्यासाठी तैनात करण्यात आले तर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आयुक्तांच्या गणपती मंदिरालगतच्या निवासस्थानी स्वतः आयुक्तांना लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आली तर लाचेची मागणी केल्यानंतर लिपिक आनंद जाधव यास अटक करण्यात आली. दरम्यान जाधव हे 23 जून 2016 रोज्ी धुळे महापालिकेत रुजू झाले होते व त्यांच्याकडे 1 जानेवारी 2019 रोजी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेकर, हवालदार नरेंद्र कुळकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, संदीप सरग, प्रशांत चौधरी, संदीप कदम, प्रकाश सोनार यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.